५०७ किमी लांबीच्या रस्त्यांची १३४३ कामे ऑक्टोबर पासून टप्प्याटप्प्याने


५०७ किमी लांबीच्या रस्त्यांची १३४३ कामे ऑक्टोबर पासून टप्प्याटप्प्याने
गेल्या दोन वर्षात ५५२.७१ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण
२०२.३१ किमी लांबीच्या रस्त्यांवरील ६२४ कामांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
     मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिका क्षेत्रातील ५०७.६२ किमी लांबीच्या रस्त्यांची १ हजार ३४३ कामे पुढील महिन्यापासून ऑक्टोबर २०१८ पासून टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत. या कामांमध्ये सध्या निविदा प्रक्रिया सुरु असलेल्या २०२.३१ किमी लांबीच्या ६२४ रस्त्यांचा समावेश आहे. तर उर्वरित ३०५.०८ किमी लांबीच्या रस्त्यांची ७१९ कामे ही पावसाळ्यामुळे थांबविण्यात आलेली व १ ऑक्टोबर पासून करावयाची कामे आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ३१ हजार ८ चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाच्या जंक्शनची कामे देखील ऑक्टोबर पासूनच टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत, अशी माहिती रस्ते व वाहतूक खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली आहे.
या सर्व कामांच्या बाबतीत कामाच्या आवश्यकतेनुसार एखाद्या रस्त्याचा काही भाग किंवा दुभाजकाच्या दुतर्फा असणा-या रस्त्याचा अर्धा भाग हा एका वर्गवारीत, तर त्याच रस्त्याचा दुसरा भाग हा अन्य वर्गवारीत समाविष्ट असू शकतो. पालिकेद्वारे १ ऑक्टोबर २०१६ ते ३१ मे २०१८ या कालावधीदरम्यान ५५२.७१ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. तसेच २ लाख ८८ हजार २७८ चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाच्या जंक्शनची कामे देखील पालिकेद्वारे करण्यात आली आहेत.
ऑक्टोबर २०१८ पासून सुरु होणारी नवीन कामे
पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर २०१८ पासून २०२.३१ किमी लांबीच्या ६२४ रस्त्यांची कामे नव्याने हाती घेण्यात येणार आहेत. या प्रकल्प कामांमध्ये शहर भागातील ४६.१६ किमी लांबीच्या १९९ रस्ते कामांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पूर्व उपनगरातील ४७.८९ किमी लांबीच्या १५५ रस्ते कामांचा यात समावेश असून; उर्वरित १०८.२६ किमी लांबीचे रस्ते हे पश्चिम उपनगरांमधील आहेत. पश्चिम उपनगरांमधील रस्ते कामांची संख्या २७० एवढी आहे नवीन रस्ते कामांसाठी ६२ निविदांची प्रक्रिया सध्या सुरु आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ऑक्टोबर २०१८ मध्ये कार्यादेश दिले जातील. या निविदांमध्ये शहर भागातील व पूर्व उपनगरातील प्रत्येकी १५; तर पश्चिम उपनगरातील ३२; यानुसार एकूण ६२ निविदांचा समावेश आहे. या कामांसाठी खर्च होणारी एकूण रक्कम ही रुपये १ हजार ५०८ कोटी ८३ लाख एवढी अंदाजित आहे. यामध्ये ३८७ कोटी एवढी रक्कम शहर भागासाठी, पूर्व उपनगरांसाठी ३७५ कोटी ६५ लाख; तर पश्चिम उपनगरांसाठी ७४६ कोटी १७ लाख रुपये एवढ्या अंदाजित रकमेचा समावेश आहे.
सध्या सुरु असलेली कामे
सध्या सुरु असलेली परंतु पावसाळ्यामुळे थांबविण्यात आलेली कामे देखील ऑक्टोबर २०१८ पासून सुरु करण्यात येत आहेत. यामध्ये ३०५.०८ किमी लांबीच्या ७१९ रस्ते कामांचा समावेश आहे. यामधील २३८.४५ किमी लांबीचे रस्ते हे 'प्रकल्प रस्ते' या वर्गवारीतील आहेत. जे रस्ते पूर्णपणे नव्याने करण्यात येणार आहेत, अशा रस्त्यांचा समावेश 'प्रकल्प रस्ते' या वर्गवारीत करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त 'प्राधान्यक्रम २' या वर्गवारीतील राहिलेल्या ७.७१ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे ऑक्टोबर पासून हाती घेण्यात येत आहेत. तर प्राधान्यक्रम ३ अंतर्गत ५८.९२ किमी लांबीच्या रस्त्यांची कामेही ऑक्टोबर २०१८ पासून हाती घेण्यात येत आहेत. 'प्राधान्यक्रम २' व 'प्राधान्यक्रम ३' अंतर्गत रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाच्या कामांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ८५ हजार ४५३ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या विविध जंक्शनच्या कामांचा देखील यात समावेश आहे.
ऑक्टोबर २०१६ ते मे २०१८ दरम्यान पूर्ण झालेली कामे
१ ऑक्टोबर २०१६ ते ३१ मे २०१८ या साधारणपणे २० महिन्यांच्या कालावधी दरम्यान ५५२.७१ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये 'प्रकल्प रस्ते' या वर्गवारीतील ३४७.३२ किमी; तर 'प्राधान्यक्रम २' या वर्गवारीतील १४६.४७ किमी लांबीच्या रस्ते कामांचा समावेश आहे. तसेच उर्वरित ५८.९२ किमी लांबीचे 'प्राधान्यक्रम ३' या वर्गवारीतील रस्त्यांची कामेही पूर्ण झाली आहेत. या व्यतिरिक्त २ लाख ८८ हजार २७८ चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाचा जंक्शन कामांचाही पूर्ण झालेल्या कामांमध्ये समावेश आहे. सर्व वर्गवारीतील पूर्ण झालेली कामे व ऑक्टोबर २०१८ पासून हाती घेण्यात येणारी कामे ही 'दोषदायित्व कालावधी' अंतर्गत असणार आहेत. प्रकल्प रस्त्यांसाठी दोष दायित्व कालावधी हा तीन वर्षांचा आहे. तर प्राधान्यक्रम २ व ३ अंतर्गत असणा-या पुनर्पृष्ठीकरणाच्या कामांचा दोषदायित्व कालावधी हा दोन वर्षांचा आहे, अशीही माहिती चिठोरे यांनी दिली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget