पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आता या वर्षापासून क्रीडा गणवेश


टी शर्ट, ट्रॅक पॅन्टसह कापडी बुटांचाही क्रीडा गणवेशात समावेश
क्रीडा गणवेशातील ४ रंगांच्या 'टी शर्ट' मुळे शाळा मैदानांवर नवे क्रीडा चैतन्य

   मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या अकराशे पेक्षा अधिक शाळांमधून सुमारे साडे तीन लाख विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवित आहेत. पुस्तकीय अभ्यासक्रमासोबतच मनपा शाळांमध्ये विविध क्रीडा प्रकारांचेही प्रशिक्षण दिले जाते. यातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासोबतच निर्णय क्षमता आणि एकंदरीत व्यक्तिमत्व विकास साधण्यास देखील मदत होते. मनपा शाळेतील क्रीडा सराव अधिक प्रभावी व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये स्वत:च्या पलीकडे जाण्याची वृत्ती निर्माण व्हावी, संघभावना  वाढीस लागण्यासह 'क्रीडा चैतन्य' विकसित व्हावे; यादृष्टीने मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना या वर्षापासून क्रीडा गणवेश देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लाल, निळा, हिरवा किंवा पिवळा अशा चार रंगांपैकी एका रंगाच्या 'टी शर्ट' चा समावेश असलेल्या या गणवेशांमुळे आता मनपा शाळांच्या मैदानांवर नव्या उत्साहासह अभिनव 'क्रीडा चैतन्य' दिसून येत आहे; अशी माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड यांनी दिली आहे.
पालिकेच्या शाळांमध्ये चांगल्या दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण दिले जाते. मनपा शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये शालेयस्तर, विभागस्तर, राज्यस्तर; यासह राष्ट्रीय स्तरावर देखील आपल्या क्रीडा नैपुण्याचा ठसा उमटवला आहे. एवढेच नाही तर पालिका शाळांतून क्रीडा कामगिरीस सुरुवात करणा-या विद्यार्थ्यांनी ऑलिम्पीक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांपर्यंतही मजल मारली आहे. मनपा शाळांतील ज्या विद्यार्थ्यांची एखाद्या विशिष्ट क्रीडा प्रकारात अधिक गती असेल, त्या विद्यार्थ्यांना त्या-त्या क्रीडा प्रकारास आवश्यक असणारा 'क्रीडावेश' व 'क्रीडा-साहित्य' सन १९९१ पासून देण्यात येत आहेत. हा 'क्रीडा वेश' हा प्राधान्याने प्रत्यक्ष स्पर्धांच्या वेळी किंवा विशेष सराव करतेवेळी वापरण्यात येतो. उदाहरणार्थ, हॉकी, ज्युदो, तायक्वांदो, इत्यादी क्रीडा प्रकारांसाठी आवश्यक असणारा वैशिष्ट्यपूर्ण 'क्रीडा-वेश' व 'क्रीडा साहित्य' मात्र, एखाद्या ठराविक क्रीडा प्रकारात गती असणा-या विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानावर खेळताना किंवा खेळांचा सराव करताना; वेगळा असा 'क्रीडा गणवेश' आतापर्यंत नव्हता. हे लक्षात घेऊन पालिका शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना 'क्रीडा गणवेश' देण्यास या वर्षी पासून सुरुवात करण्यात आली आहे शैक्षणिक क्षेत्रात क्रीडा गणवेश ठरविताना ते विद्यार्थ्यांचे काही गट तयार करुन व प्रत्येक गटाचा एक रंग निश्चित करुन देण्याची पद्धत आहे. या गटांना रंगांच्या नावासह 'हाऊस' असे म्हटले जाते. उदाहरणार्थ; रेड हाऊस, ब्ल्यु हाऊस, ग्रीन हाऊस किंवा यलो हाऊस. या रंग आधारित 'हाऊस' निहाय विभागणीमुळे विविध खेळ खेळताना संघ भावना तयार होण्यास मदत होते. यानुसार मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांचेही चार गट तयार करुन त्यांना चार रंगांचे क्रीडा गणवेश देण्यात आले आहेत. या अंतर्गत प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्यी चार गटांमध्ये विभागणी करुन, त्या प्रत्येक गटातील विद्यार्थ्यास लाल, निळा, हिरवा किंवा पिवळा अशा चार रंगांपैकी एका रंगाच्या 'टी शर्ट' सह क्रीडा गणवेश देण्यात आला आहे.
मनपा शाळांमधून शिकणा-या सुमारे साडे तीन लाख विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या क्रीडा गणवेशात टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट व कापडी बूट  यांचा समावेष आहे. या गणवेशातील 'टी शर्ट' व 'ट्रॅक पॅन्ट' ही टिकाऊ कापडापासून तयार करण्यात आली आहे मनपा शाळांमध्ये विविध क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी सोमवार ते शुक्रवार या दरम्यान आवश्यकतेनुसार व विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार एक किंवा अधिक तासिका राखून ठेवण्यात येतात. या व्यतिरिक्त दर शनिवारी विविध क्रीडा प्रकाराचा विशेष सराव देखील घेतला जातो. क्रीडा प्रकारांचा 'नियमित सराव' आणि आठवड्यातून एक दिवस घेतला जाणारा 'विशेष सराव'; या दरम्यान मनपा शाळांमधील क्रीडा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकारांच्या वैशिष्ट्यांची प्रात्यक्षिकांसह माहिती देऊन त्यांच्याकडून खेळांचा सराव करवून घेतात. यापैकी दर शनिवारी घेतल्या जाणा-या विशेष सरावादरम्यान या वर्षापासून देण्यात आलेला क्रीडा गणवेश असणे अनिवार्य करण्यात आले आहे, अशीही माहिती ज-हाड यांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget