डॉ. बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर


-आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण देणारे कर्मचारी 'महिन्याचे मानकरी'
-राष्ट्रीय गौरवाच्या निमित्ताने संचालक डॉ. अविनाश सुपे यांचाही सन्मान
-प्रसंगावधान दाखवत अनेकांचे प्राण वाचविणा-या जेन सदावर्तेचेही कौतुक


    मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) –  पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांना वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'डॉ. बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला आहे. या निमित्ताने आजच्या मासिक आढावा बैठकीच्या सुरुवातीला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी डॉ. सुपे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच गेल्या तीन वर्षात सुमारे २५ हजार व्यक्तींना आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणा-या चमूतील महापालिका कर्मचारी राजेंद्र रामचंद्र लोखंडे, प्रविण शंकर ब्रम्हदंडे व भरतकुमार सुधाकर फुणगे यांचा प्रातिनिधीक स्वरुपात 'सप्टेंबर – २०१८' करिता 'महिन्याचे मानकरी' अर्थात 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने पालिका आयुक्तांच्या हस्ते आजच्या बैठकीदरम्यान सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर आगीच्या एका दुर्दैवी घटनेदरम्यान शाळेत मिळालेल्या आपत्कालीन व्यवस्थापन विषयक प्रशिक्षणाचा समयोचित उपयोग करित व प्रसंगावधान दाखवित अनेकांचे प्राण वाचविणा-या जेन गुणरत्न सदावर्ते या शालेय विद्यार्थिनीला आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ व शाल देऊन तिचेही आजच्या बैठकीदरम्यान विशेष कौतुक करण्यात आले.
पालिकेच्या मुख्यालयात पालिका अधिका-यांची मासिक बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान आयोजित सन्मान, सत्कार व कौतुक प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्रीमती आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे)  विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर)  आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह पालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. तसेच जेन सदावर्ते या विद्यार्थिनीच्या सत्कार प्रसंगी 'डॉन बॉस्को इंटरनॅशल' शाळेच्या प्राचार्या श्रीमती मीना साल्ढान्हा यादेखील विशेषत्वाने उपस्थित होत्या.पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना विविध आपत्तींचा मुकाबला अधिकाधिक प्रभावीपणे करता यावा, यासाठी आपत्कालीन व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नियमितपणे दिले जात असते. गेल्या तीन वर्षात दोनशे प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे सुमारे २५ हजार व्यक्तींना आपत्कालीन व्यवस्थापनाचे 'थेट प्रशिक्षण' देणा-या प्रशिक्षकांच्या चमूचा प्रातिनिधीक सन्मान आजच्या बैठकी दरम्यान करण्यात आला. या चमूमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन खात्यातील नियंत्रण कक्ष पर्यवेक्षक राजेंद्र लोखंडे, जल अभियंता खात्याच्या भांडूप संकूल येथील कार्यालयात 'मदतनीस' म्हणून कार्यरत असणारे प्रविण ब्रम्हदंडे आणि पूर्वी अग्निशमन दलात कार्यरत असणारे व सध्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्यात नियंत्रण कक्ष चालक असणारे भरतकुमार फुणगे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. काही दिवसांपूर्वी हिंदमाता परिसरातील एका इमारतीमध्ये आग लागण्याची एक दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेदरम्यान जेन सदावर्ते या शालेय विद्यार्थीनीने प्रसंगावधान राखत एका प्रशिक्षणादरम्यान तिच्या शिक्षकांनी दिलेल्या माहितीचा सदुपयोग केला. यात प्रामुख्याने आगीच्या दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना सुती कापड ओले करुन नाका तोंडावर धरण्याच्या उपायाचा समावेश होता. या एका छोट्याश्या पण अत्यंत महत्त्वाच्या बाबीमुळे त्या दिवशी अनेकांचे प्राण वाचले. या घटनेने आपत्कालीन व्यवस्थापनाच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज अधोरेखित झाली. सदर विद्यार्थिनीला तिच्या ज्या शिक्षकांनी आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले होते, त्या शिक्षकांना पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील  पर्यवेक्षक  राजेंद्र रामचंद्र लोखंडे यांनी प्रशिक्षण दिले होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन जेन सदावर्ते या विद्यार्थिनीला व तिच्या शाळेच्या प्राचार्यांनाही आजच्या बैठकी दरम्यान विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी तिचे पालकही उपस्थित होते.
आपत्कालीन व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देणा-या पालिका चमूतील पर्यवेक्षक श्री. राजेंद्र रामचंद्र लोखंडे, जल अभियंता खात्यातील मदतनीस प्रविण शंकर ब्रम्हदंडे आणि पूर्वी मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असणारे व सध्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्यात नियंत्रण कक्ष चालक असणारे  भरतकुमार सुधाकर फुणगे यांचा प्रातिनिधीक स्वरुपात 'सप्टेंबर- २०१८' या महिन्यासाठी 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने सत्कार करताना पालिका आयुक्त  अजोय मेहता. समवेत अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्रीमती आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर)  आबासाहेब ज-हाड, उपायुक्त श्रीमती निधी चौधरी, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अधिकारी  महेश नार्वेकर व मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे उपस्थित होते
> पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांना नुकताच वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा 'डॉ. बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला आहे. यानिमित्ताने आज संपन्न झालेल्या पालिका अधिका-यांच्या मासिक बैठकीच्या सुरुवातीला महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते डॉ. सुपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्रीमती आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड व उपायुक्त श्रीमती निधी चौधरी उपस्थित होत्या आगीच्या एका दुर्दैवी घटनेदरम्यान शाळेत मिळालेल्या आपत्कालीन व्यवस्थापन विषयक प्रशिक्षणाचा समयोचित उपयोग करित व प्रसंगावधान दाखवित अनेकांचे प्राण वाचविणा-या जेन गुणरत्न सदावर्ते या शालेय विद्यार्थिनीला पालिका आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ व शाल देऊन तिचे आज विशेष कौतुक करण्यात आले. याप्रसंगी जेन सदावर्तेच्या पालकांसह ती ज्या शाळेत शिकते, त्या शाळेच्या प्राचार्या श्रीमती मीना साल्ढान्हा या देखील उप॑स्थित होत्या.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget