प्रभावी आपत्कालीन व्यवस्थापनासाठी विदयार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण


२०१६ पासून २३ हजार ८५७ व्यक्तींना देण्यात आले थेट प्रशिक्षण
प्रशिक्षण प्राप्त शिक्षकांद्वारेही उर्वरित विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण

मुंबई  ( प्रतिनिधी ) – मुंबईतील महत्त्वाच्या  हिंदमाता परिसरातील एका इमारतीमध्ये काल आगीची दुर्दैवी घटना घडली. याच दुर्घटनेदरम्यान एका शालेय विद्यार्थीनीने प्रसंगावधान राखत व समयसूचकता दाखवित आपत्कालीन प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या माहितीचा उपयोग केला. ज्यामुळे अनेकांचे जीव वाचले. या घटनेने आपत्कालीन व्यवस्थापनाच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज अधारेखीत झाली आहे. विविध आपत्तींचा मुकाबला अधिकाधिक प्रभावीपणे करता यावा, यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विषयक प्रशिक्षणाची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे आपत्कालीन व्यवस्थापन विषयक शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नियमितपणे दिले जाते. काही प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना थेटपणे प्रशिक्षण दिले जाते. तर काही वेळा हे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाऊन नंतर हे प्रशिक्षणप्राप्त शिक्षक त्यांच्या विदयार्थ्यांना प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षण कार्यकमांतर्गत यावर्षी आतापर्यंत ६ हजार ७८४ व्यक्तींना थेट प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी दिली आहे.
आग, इमारत कोसळणे, बॉम्ब स्फोट, भूकंप, पूर, वादळ यासारख्या नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तींचा मुकाबला अधिक प्रभावीपणे करता यावा, यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे विविध स्तरीय प्रशिक्षण मोफत स्वरुपात दिले जात असते. यानुसार पालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयतील शिक्षक व विद्यार्थ्यांना आपत्कालीन व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण मोफत दिले जाते. या प्रशिक्षणादरम्यान आग लागण्यासारखी दुर्घटना घडल्यास आग विझविण्याकरिता व इतर बाबींसाठी घरगुती साधनांचा प्रभावी वापर करणे, प्रथमोपचार, उपलब्ध साधनांचा वापर करुन स्ट्रेचर तयार करणे, आपत्कालीन प्रसंगी काय करावे व काय करु नये यारख्या बाबींची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाते. बहुतांश शाळा, महाविद्यालयांमध्ये हे प्रशिक्षण थेटपणे शिक्षकांना दिले जाते हे प्रशिक्षणप्राप्त शिक्षक नंतर विद्यार्थ्यांना व इतर शिक्षकांनाही प्रशिक्षण देतात गेल्या काही वर्षात पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे पालिका शाळांमधील शिक्षकांसह केंद्रिय विद्यालय, डॉन बॉस्को इंटरनॅशनल, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, के.सी. कॉलेज, खालसा महाविद्यालय, सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भारती विद्यापीठ, भारतीय विद्या भवन, लॉर्ड्स युनिव्हर्सल कॉलेज, रतनचंद्राजी इंग्लिश मिडियम स्कूल, वालीया कॉलेज, गाला कॉलेज, सोफीया कॉलेज, ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल, अंजुमने इस्लाम कॉलेज, लाला लजपतराय कॉलेज, रुईया कॉलेज, विल्सन कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज, गुरुकुल कॉलेज, गांधी बाल मंदिर, जे. एम. पटेल कॉलेज, हिंदुजा कॉलेज, मायकेल हायस्कूल, सिडनेहॅम कॉलेज, बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, सेंट ऍन्ड्रूज कॉलेज, इन्स्टिट्यूट ऑफ लेबर स्टडिज यासारख्या अनेक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक किंवा विद्यार्थ्याना आपत्कालीन व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे.शालेय विदयार्थ्यांना प्रशिक्षण देणे अधिक सुलभ व्हावे, याकरिता उंदीरमामाच्या आकर्षक रेखाचित्रांचा वापर करुन 'आपली सुरक्षा आपल्या हाती' हे प्रबोधनात्मक माहिती पुस्तिक देखील काही वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आले होते. या पुस्तकाला शालेय विदयार्थ्यांचाच नव्हे, तर शिक्षकांचाही उत्साहवर्धक प्रतिसाद लाभत आहे. अनेक शाळांमध्ये तर या रेखाचित्रांच्या छायाप्रती वितरीत करुन चित्र रंगवा सारखे उपक्रम देखील घेण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये देण्यात येणा-या प्रशिक्षणांव्यतिरिक्त शासकीय व निमशासकीय कार्यालये, पोलीस, रुग्णालये, स्वयंसेवी संस्था इत्यादींनाही आपत्कालीन व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देण्यात येते. याअंतर्गत डॉक्टर्स, परिचारिका, पत्रकार, अभियंता, अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते इत्यादींनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच हज यात्रेला जाणा-या यात्रेकरुंच्या देशभरातील ३ हजार १५० प्रशिक्षकांना आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण पालिकेद्वारे देण्यात आले आहे. या प्रशिक्षण प्राप्त केलेल्या प्रशिक्षकांनी देशभरातील त्यांच्या त्यांच्या जिल्यात जाऊन तेथील हज यात्रेकरुना प्रशिक्षण दिले आहे पालिकेच्या आपत्कालीन खात्याद्वारे यावर्षी जानेवारी पासून ५२ प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले असून याद्वारे ६ हजार ७८४ व्यक्तींना थेट प्रशिक्षण देण्यात आले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये ६ हजार ४५० व्यक्तींना ६६ प्रशिक्षण कार्यकमांद्वारे थेट प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर वर्ष २०१६ मध्ये ७० प्रशिक्षण कार्यकमांद्वारे १० हजार ६२३ व्यक्तींना थेट प्रशिक्षण देण्यात आले होते. यानुसार जानेवारी २०१६ पासून आतापर्यंत १८८ प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे २३ हजार ८५७ व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले आहे काल हिंदमाता परिसरात घडलेल्या घटनेच्या पाश्वभूमीवर 'डॉन बॉस्को इंटरनॅशनल' शाळेच्या प्राचार्या श्रीमती मीना साल्ढान्हा यांचाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, त्यांच्या शाळेत विविध विषयांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचेही धडे देण्यात येतात. या अनुषंगाने शाळेच्या शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे प्रशिक्षक राजेंद्र लोखंडे यांनी प्रशिक्षण दिले होते. या प्रशिक्षणातून प्राप्त झालेली माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली होती. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सदर प्रशिक्षण चांगले असल्याचाही उल्लेख प्राचार्या यांनी सांगितले अधिक प्रभावी आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविदयालये इत्यादींना त्यांच्या शिक्षकांसाठी किंवा विदयार्थ्यांसाठी महापालिकेद्वारे मोफत स्वरुपात देण्यात येणा-या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन महेश नार्वेकर यांनी केले आहे यासाठी संबंधित शिक्षण संस्थेने पुढील पत्यावर संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे
संपर्क पत्ता: ''प्रमुख अधिकारी, आपत्कालीन व्यवस्थापन, दुसरा मजला, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय (विस्तारित इमारत), महापालिका मार्ग, मुंबई – ४०० ००१''

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget