"कथारंगचे" गणेश मतकरी यांच्या हस्ते उद्घाटन.

रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कथाकार गणेश मतकरी यांच्या हस्ते झाले.

साक्षी तावडे
घाटकोपर, मुंबई : रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन  युवापिढीचे कथाकार गणेश मतकरी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाच्या निमित्ताने  आयोजित करण्यात  आलेल्या,  डाॅ. सुधा जोशी पुरस्कृत " कथारंग" कार्यक्रमात मतकरी  यांनी " आजची मराठी कथा: प्रभाव आणि बदल" या विषयावर  आपले विचार मांडले.  त्यांनी कथा या प्रकाराची एकूण वैशिष्ट्ये,  मराठीतील पूर्वसुरींच्या कथेचे सामर्थ्य - मर्यादा आणि त्या पार्श्वभूमीवर समकालीन मराठी  कथेतील बदल आणि वैशिष्ये अशा तीन भागात सूत्रबद्ध विवेचन केले. "उशीर" या स्वलिखित कथेचे अत्यंत प्रभावी अभिवाचन करत त्यांनी निवेदक कथेची रचना, त्यातील प्रतीके, पात्रे आणि कथा आकारास येण्याची प्रक्रिया याचा मनोरंजक प्रवासही सांगितला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी विभागप्रमुख डाॅ. स्नेहा देऊस्कर यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी वाङ्मय मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उद्घाटनाच्या कार्यक्रमावर आधारित  वृत्तांतलेखन, काव्यपूर्ती,  साहित्य- चित्र-वेध, सूरां मी वंदिले ही मराठी गीतगायन स्पर्धा,  आंतरमहाविद्यालयीन वक्त्वृत्व  स्पर्धा आणि आविष्कार हे भित्तिपत्रक अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमांचा उल्लेख केला. प्रभारी प्राचार्य डाॅ. हिमांशू दावडा यांनी  वाङ्मय मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक करीत त्याचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करीत विभागाला शुभेच्छा दिल्या.कथारंगच्या पहिल्या  कार्यक्रमाला रत्नाकर मतकरींसारखे ज्येष्ठ कथाकार लाभले होते तर या पाचव्या वर्षीच्या कार्यक्रमाला त्यांचेच चिरंजीव युवा साहित्यिकांच्या पिढीचे प्रतिनिधी महाविद्यालयात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मराठी विभागातील प्राध्यापिका डाॅ .नीलांबरी कुलकर्णी यांनी  पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि  आभारही व्यक्त केले. कार्यक्रमाला उपप्राचार्या प्रा. शुभांगी वर्तक,  उपप्राचार्या डाॅ. सीमा रत्नपारखी, पर्यवेक्षिका शलाका प्रधान,  मराठी विभागातील अध्यापिका  दीपा ठाणेकर व डाॅ. लतिका भानुशाली  व इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या निमित्ताने  गणेश मतकरी यांच्या ग्रंथाचे छोटेखानी प्रदर्शन महाविद्यालयाच्या  ग्रंथालयातर्फे सभागृहातच आयोजित करण्यात आले होते.
   कथा व कादंबरी यातील भेदासंदर्भात बोलताना मतकरी यांनी  कथानकाची लांबी,  आवाका,  पात्रांचा पसारा या नेहमीच्या मुद्द्यांखेरीज असा एक नाविन्यपूर्ण मुद्दा सांगितला की कथा शाॅर्ट फिल्मसारखी असते व तिच्यात प्रयोगशीलतेला वाव जास्त असतो. पूर्ण लांबीची फिल्म ही शाॅर्ट फिल्मच्या मानाने कन्हेन्शनल असते. कादंबरी ही पूर्ण लांबीच्या फिल्मसारखी असते. कथा ही एखाद्या घटना,  भावना,  विचार यांभोवतीसुद्धा फिरू शकते हे त्यांनी अनेक मराठी व पाश्चात्य लेखकांच्या कथांच्या उदाहरणातून सांगितले.
            पूर्वसुरींच्या कथांसंदर्भात बोलताना त्यांनी नवकथाकार, स्त्रीवादी लेखिका गौरी देशपांडे , ग्रामीण कथाकार,  विज्ञान कथा यांचा उल्लेख केला. पण ही कथा प्रामुख्याने मानवी नातेसंबंध आणि सामाजिकता याच घटकांमधे अडकून पडली. त्यातही मध्यमवर्गीय सेंन्सिबिलिटीने कथेची बरीचशी जागा अडकविली. विज्ञानकथेचा तुरळक अपवाद वगळता भयकथा,  गूढकथा, फँटसी,  जादुई कथा रहस्यकथा , मिथकथा यासारखे इतर अनेक प्रकार भरपूर वाचकसंख्या आपल्याकडे विकसित होऊ शकले नाहीत . कारण लोकप्रिय साहित्याला कमी दर्जाचे मानण्याचा आपला प्रघात आहे. त्यामुळे समकालीन पाश्चात्य साहित्यात जशी विविध प्रकारची कथा लिहिली  गेली तसे आपल्याकडे झाले नाही.
     ग्लोबलायझेननंतरच्या काळात जीवनशैली, मूल्ये आणि जगण्याकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा बदलल्या .याचे चित्र आजची कथा मांडते. ती १९९० नंतरच्या काळाशी सुसंगत राहत ,त्या काळाचे प्रतिनिधित्व करत या बदलेल्या जीवनाचे चित्रण करते.समकालीन राजकारण,  समाज यांचे संदर्भ आजच्या कथेत असतात.  उदाहरणार्थ बदलत गेलेल्या  गिरणगावासह शहर कसे बदलत गेले हे जयंत पवारांच्या कथेतून येते. जयंत पवार, सतीश तांबे, प्रणव सखदेव, मनस्विनी लता रवींद्र, ह्रषीकेश गुप्ते,  पंकज भोसले, आसाराम लोमटे इत्यादी लेखकांचा आजच्या पिढीचे कथाकार म्हणून त्यांनी उल्लेख केला.
स्वतःच्या कथेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की प्रत्यक्ष घटनांपेक्षा माणसाच्या मनात काय चालते याचा वेध त्यांच्या  कथेत घेतला जातो. पूर्वी कुटुंब म्हणजे समान विचाराच्या व्यक्तींचा समूह असे. आता कुटुंब वेगवेगळ्या स्वतंत्र  व्यक्तींचा एकत्र राहणारा गट असतो. हे त्यांच्या कथेत पकडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
 व्यक्तीचा अवकाश व त्यावर टेक्नाॅलाॅजीचा परिणाम,  कथा कोणत्या जागी घडते हेही त्यांच्या कथेत महत्वाचे घटक असतात. उशीर या कथेचे अभिवाचन व विश्लेषण करीत त्यांनी स्वतःच्या कथेची वैशिष्ट्ये सांगितली. कथारंग मालिकेतील ह्या वर्षीच्या व्याख्यानाने  विद्यार्थ्यांना खूप समृद्ध केले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget