चेंबूरमध्ये तब्बल साडेसात एकरांवरील अतिक्रमणांवर धडक कारवाई


४७० झोपड्या हटविल्या, उर्वरित २५० झोपड्या हटविण्याची कारवाई वेगात
मुंबई पोलीसांच्या मदतीने महापालिकेने हटविली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे

  मुंबई ( प्रतिनिधी ) –  चेंबूर परिसरातील 'घाटकोपर मानखुर्द लिंक रोड' जवळ राज्य शासनाच्या अखत्यारितील अडीच एकराच्या भूखंडावर १७० झोपड्या उद्भवल्या होत्या. तर याच परिसरातील नागेवाडी भागातील मॉडर्न शाळेजवळ व रंगप्रभा इमारतीसमोर शासनाच्याच अखत्यारितील पाच एकराच्या भूखंडावर सुमारे ५५० झोपड्या उद्भवल्या होत्या. यानुसार एकूण सुमारे साडे सात एकरांच्या दोन भूखंडांवर उद्भवलेल्या अतिक्रमणांवर पालिकेद्वारे गेले तीन दिवस धडक कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत घाटकोपर मानखुर्द लिंक रोडजवळील अडीच एकरांच्या भूखंडावरील सर्व म्हणजे १७० झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. तर दुस-या ५ एकरांच्या भूखंडावरील ३०० झोपड्या आतापर्यंत हटविण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीसांच्या मदतीने सुरु असलेल्या या संयुक्त कारवाई दरम्यान आतापर्यंत सुमारे ४७० झोपड्या हटविण्यात आल्या असून उर्वरित सुमारे २५० झोपड्या हटविण्याची कारवाई देखील प्रगतीपथावर आहे, अशी माहिती परिमंडळ ५ चे उपायुक्त भारत मराठे यांनी दिली आहे.

चेंबूर परिसरात राज्य शासनाच्या विविध खात्यांच्या व प्राधिकरणांच्या अखत्यारित असणारे २ भूखंड आहेत. सुमारे साडे सात एकर एवढे क्षेत्रफळ असणा-या या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे उद्भवली होती. ही अतिक्रमणे हटवून भूखंड मोकळा करण्याबाबत पालिकेच्या परिमंडळ – ५ चे उपायुक्त  भारत मराठे यांच्या पुढाकाराने त्यांच्या कार्यालयात एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चेंबूर परिसराचे संबंधित उपजिल्हाधिकारी, वन विभागाचे व मीठागर प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत सदर अतिक्रमणे हटविण्याबाबत संयुक्त कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार गेले तीन दिवस अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई सुरु आहे. ही कारवाई आज संध्याकाळ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.सदर दोन्ही भूखंडांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मुंबई पोलीस दलातील १३७ पोलीसांचा ताफा घटनास्थळी तैनात असून याकरिता टिळक नगर पोलीस ठाण्याचे विशेष सहकार्य पालिकेला लाभले आहे. या व्यतिरिक्त पालिकेचे १२० कामगार-कर्मचारी-अधिकारी देखील या कारवाईत सहभागी आहेत. तसेच या ठिकाणी राज्य शासनाच्या संबंधित खात्याचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित आहेत. या कारवाईसाठी २ जेसीबी, २ पोकलेन व ४ डंपर अशी यंत्रसामुग्री देखील वापरण्यात येत आहे, अशीही माहिती उपायुक्त भारत मराठे यांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget