आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ३० खोल्यांचे अनधिकृत हॉटेल तोडले


आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ३० खोल्यांचे अनधिकृत हॉटेल तोडले
७ महिन्यात उभे राहिले होते १० हजार चौ. फूटांचे अनधिकृत बांधकाम
मुंबई पोलिसांच्या मदतीने महापालिकेच्या 'के पूर्व' विभागाची धडक कारवाई


   मुंबई ( प्रतिनिधी ) –   छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर गेल्या काही महिन्यांपासून एक अनधिकृत बांधकाम उभे राहत होते. ३० खोल्या असणा-या व १० हजार चौरस फूटांपेक्षा अधिक आकार असणा-या या बांधकामाचा वापर निवासी हॉटेल पद्धतीने होण्याची शक्यता होती. मात्र विमानतळाजवळ अशाप्रकारे अनधिकृत बांधकाम असणे, हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होते. हे लक्षात घेत, पालिकेच्या 'परिमंडळ – ३' चे उपायुक्त आनंद वागराळकर यांच्या मार्गदर्शनानुसार त्या बांधकामावर तोडकाम कारवाई सुरु करण्यात आली. मात्र, ते बांधकाम करणा-यांनी 'बाऊन्सर' आणून पालिकेच्या पथकाचा रस्ता अडविला. त्यानंतर मुंबई पोलिस दलाचे उपायुक्त  सुनील कुंभारे यांनी विशेष सहकार्य करित पालिकेच्या पथकाला आणि कार्यवाहीला संरक्षण देण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तात्काळ पाठविला. ज्यानंतर अवघ्या १२ तासात पालिकेच्या पथकाने ते तीन मजली बांधकाम जमीनदोस्त केले. तर कार्यवाहीला विरोध करणा-यांवर गुन्हा दाखल करण्यासह २ इसमांना अटकही झाली, अशी माहिती 'के पूर्व' विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे.
अंधेरी पूर्व मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असणा-या 'सहार व्हिलेज' परिसरातील सुतार पाखाडी भागात नगर भूमापन क्रमांक १२९ (पॉइंट) व १३० (पॉइंट) या भूखंडावर तीन मजली इमारत अनधिकृतपणे बांधण्यात येत होती. या भूखंडावर गेल्या सुमारे ७ महिन्यांपासून सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत मुंबई पालिकेद्वारे 'एमएमआरडीए'ला वेळोवेळी कळविण्यात आले होते. तथापि, काही दिवसांपूर्वी 'एमएमआरडीए'च्या स्थानिक अधिका-यांनी सदर सीटीएस क्रमांक हा त्यांच्या अखत्यारित येत नसल्याचे व सदर बाबत पालिकेद्वारे कारवाई करण्याचे कळविले. त्यानंतर पालिकेद्वारे सदर बांधकामास 'स्टॉप वर्क' नोटीस देण्यात आली. तसेच न्यायालयात 'कॅव्हेट' देखील दाखल करण्यात आले.
पालिकेद्वारे 'स्टॉप वर्क' नोटीस दिल्यानंतर देखील संबंधितांनी अनधिकृत बांधकाम उभारण्याचे थांबविले नाही. यानंतर 'के पूर्व' विभागाच्या ३० कामगार – कर्मचारी - अधिका-यांद्वारे या बांधकामावर तोडकाम कारवाई सुरु करण्यात आली. मात्र, अनधिकृत बांधकाम करणा-यांनी पालिकेच्या पथकाचा रस्ता अडविला. तसेच पालिकेचे पदनिर्देशित अधिकारी  अमोल चोनपुरगे व मुकादम दीपक कुरतडकर यांच्याशी गैरवर्तवणुक देखील केली
> > तसेच पालिकेच्या पथकाच्या मार्गात वाळूच्या गोण्या देखील टाकल्या. यासर्व बाबी लक्षात घेऊन या कारवाईसाठी संरक्षण मिळावे याकरिता मुंबई पोलीस दलाला विनंती करण्यात आली. मुंबई पोलीस दलाने देखील वेगाने हालचाली करत या कारवाईसाठी २० पोलिसांचा फौजफाटा तात्काळ उपलब्ध करुन दिला. ज्यानंतर बुलडोजर, जेसीबी व अन्य साधनसामुग्रीच्या सहाय्याने सदर अनधिकृत बांधकाम अवघ्या १२ तासात जमीनदोस्त करण्यात आले, अशीही माहिती सकपाळे यांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget