मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचे सकारात्मक पाऊल


विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरविणारे मार्गदर्शन ९वी पासूनच
शेतीक्षेत्र, संरक्षण व पोलीसात जाण्यास मनपा शाळेतील आग्रक्रम

 प्रतिनिधी अल्पेश करकरे
मुंबई  – पालिकेच्या शाळांमध्ये सध्या दहावीत शिकणा-या ९.४६ टक्के विद्यार्थ्यांना शेतीमध्ये रस असून त्यांना 'शेतीतज्ज्ञ'व्हायचे आहे, तर ७.३० टक्के विद्यार्थ्यांना देश रक्षणासाठी सैन्यात जाण्याची आणि ७.२५ टक्के विद्यार्थ्यांना पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा आहे. मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण व कल लक्षात घेत, त्यांना त्यांच्या करिअरची दिशा ठरविता यावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन व समुपदेशन सत्रा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने ही आकडेवारी पुढे आली आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने करण्यात येत असलेल्या या मोफत स्वरुपाच्या उपक्रमाचा गेल्यावर्षी नववीत असणा-या साडे बारा हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला होता. याच उपक्रमादरम्यान सदर सर्वेक्षण करण्यात आले होते. आता यावर्षी देखील ६ ऑगस्ट २०१८ पासून या उपक्रमास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त शिक्षण मिलिन सावंत यांनी दिली आहे.
      याबाबत अधिक माहिती देताना पालिकेचे शिक्षणाधिकारी  महेश पालकर यांनी सांगितले  मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी 'करिअर'च्या दृष्टीने दहावी नंतर कोणते क्षेत्र निवडावे? या अनुषंगाने त्यांना शास्त्रीय पद्धतीवर आधारित समुपदेशन व सुयोग्य मार्गदर्शन मिळावे, या हेतूने गेल्यावर्षीपासून मनपा शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. 'अंतरंग फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमादरम्यान गेल्यावर्षी नववीत शिकणा-या सुमारे साडे बारा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे यासाठीचा सर्व खर्च संबंधित स्वयंसेवी संस्थेद्वारेच केला जात असल्याने हा उपक्रम मनपा शाळांसाठी मोफत स्वरुपात राबविला जात आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सोमवार ते शुक्रवार, असे सलग पाच दिवस दररोज तीन तास तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांशी गटनिहाय संवाद साधतात. साधारणपणे प्रत्येक गटात सुमारे ४० विद्यार्थ्यांचा समावेश असतो. यापैकी पहिल्या दोन दिवसात विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण व त्यांचा कल शास्त्रीय पद्धतीने अभ्यासला जातो. यादरम्यान संबंधित विद्यार्थ्याचा जो कल लक्षात येईल, त्यानुसार अनुरूप असणा-या अभ्यासक्रमांच्या माहितीसह नोकरी व व्यवसाय यांची माहिती विद्यार्थ्यास दिली जाते. तर पहिल्या सत्राच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच पाचव्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांशी पुन्हा एकदा संवाद साधला जातो. उपक्रमाच्या दुसरा टप्प्यांतर्गत एक विशेष समुपदेशन सत्र घेतले जाते. हे सत्र पहिल्या टप्प्यानंतर येणा-या दुस-या आठवड्यातल्या शनिवारी घेतले जाते. या सत्रा दरम्यान सर्व विद्यार्थ्यांशी, त्यांच्या शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांशीही चर्चा केली जाते. या चर्चेत विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीची पुन्हा एकदा उजळणी केली जाते. त्यात काही बदल जाणवल्यास त्याची नोंद घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा अहवाल स्वतंत्रपणे देण्यात येतो. या अहवालाची एकत्रित प्रत ही संबंधित शाळेला देण्यात येते. तर हा उपक्रम आयोजित करणा-या स्वयंसेवी संस्थेकडे अहवालाची एक प्रत जतन केली जाते.
या उपक्रमाचा शेवटचा आणि तिसरा टप्पा हा संबंधित विद्यार्थी दहावीत गेल्यानंतर घेतला जातो. या अंतर्गत दहावीच्या पहिल्या सहा महिन्यात एक उजळणी सत्र व दहावीच्या अंतिम परीक्षेपूर्वी दुसरे उजळणी सत्र घेतले जाते. या उजळणी सत्रांदरम्यान आदल्या वर्षीचे निष्कर्ष पुन्हा एकदा तपासून पाहिले जातात. या दरम्यान विद्यार्थ्याच्या 'करिअर' विषयक कला बाबत काही बदल जाणवल्यास त्याची नोंद घेऊन त्या आधारे विद्यार्थ्याचे पुन्हा एकदा समुपदेशन केले जाते. तसेच या तिस-या सत्रातील संवादादरम्यान विद्यार्थ्यांच्या मनात दहावीच्या परीक्षेबद्दल भिती असेल किंवा करिअर विषयक स्पर्धेबाबत नकारात्मकता असल्यास त्याबाबत देखील समुपदेशन केले जाते. यानंतर संबंधित विद्यार्थ्यांला त्याच्या कल चाचणीच्या अनुषंगाने अंतिम अहवालाची प्रत दिली जाते विद्यार्थ्याला देण्यात येणा-या अहवालामध्ये संबंधित स्वयंसेवी संस्थेचे नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक दिलेला असतो. जेणेकरुन सदर विद्यार्थ्यांला करिअरच्या दृष्टीने काही मार्गदर्शन लागल्यास थेटपणे संपर्क करता यावा. या स्तरावर देखील सदर संस्था मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करते सध्या सुरु असलेले शैक्षणिक वर्ष २०१८–१९ साठी करिअर मार्गदर्शन व समुपदेशनाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात ६ ऑगस्ट २०१८ पासून होत आहे. या वर्षी नववीचे वर्ग असणा-या २१० मनपा शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. हा उपक्रम मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतून घेतला जाणार आहे. तसेच गेल्या वर्षीचे अनुभव लक्षात घेऊन या वर्षी या उपक्रमात आवश्यक त्या सुधारणा देखील करण्यात येणार आहे, अशीही माहिती पालकर यांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget